भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय :अजित पवार

भाववाढीचे गाजर दाखवत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय :अजित पवार

नागपूर : जाहीर केलेले भाव द्यायचे नाही आणि चुनावी जुमला डोळयासमोर ठेवून भाववाढीचे गाजर दाखवायचे ही शेतकऱ्यांची धादांत फसवणूक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला.

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आज विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार केला.निवडणूकीच्या मतावर डोळा ठेवून सरकारने हे सगळं जाहीर केले आहे. चारवर्षापूर्वी खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देवू असे सांगितले आणि आता सांगत आहेत की आम्ही दिली आहे. परंतु ही आकडेवारी फसवी आहे. आधारभूत किंमत देण्याचा स्वामीनाथन आयोगाचा जो फॉर्मुला आहे तो यांनी बासनात गुंडाळून ठेवला आहे असा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी विरोधी हे सरकार कशापध्दतीने वागत आहे हे चर्चेदरम्यान त्यांचे कटकारस्थान समोर आणणार असल्याचेही अजितदादांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही.पीकविम्याची रक्कम नाही.मुळात मंडळ हा गाभा धरुन पीकविम्याची रक्कम मिळायला हवी होती परंतु यांनी तालुका केला आहे. त्यामुळे आमचा शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. पीकविम्याच्याबाबतीत पीकविमा कंपन्यांना गब्बर करण्याचे आणि शेतकऱ्याला कंगाल करण्याचे काम भाजप-शिवसेना सरकारने केले असून त्याचा आम्ही निषेध केला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Previous articleबोंड अळी व धानाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे आक्रमक
Next articleदीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवलेः खा. अशोक चव्हाण