साडे तीन वर्षाचं सरकारचं नियोजन फसलं तसंच पावसाळी अधिवेशन घेवून फसलं : धनंजय मुंडे

साडे तीन वर्षाचं सरकारचं नियोजन फसलं तसंच पावसाळी अधिवेशन घेवून फसलं : धनंजय मुंडे

नागपूर : साडेतीन वर्षात सरकारचं जसं नियोजन पूर्णपणे फसलं आहे तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेवून हे सरकार फसलं आहे अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पावसाने विधानमंडळातील वीजपुरवठा खंडीत झाला.विधानमंडळ पावसाच्या पाण्याखाली गेले त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सरकारच्या या अनागोंदी कारभारावर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी सडकून टिका केली आहे.

पावसाळी अधिवेशन यापूर्वी कधी नागपूरमध्ये झाले नव्हते. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की,पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेवू नका. पाऊस जर एक मोठा पडला तर नागपूरमध्ये राहण्याच्या व्यवस्थेपासून ते विधीमंडळाच्या कामकाजापर्यंत परिणाम होईल आणि आज तो दिवस आला. याचसाठी केला होता अट्टाहास असंच आता म्हणावे लागेल असेही  मुंडे म्हणाले.

आज विधानमंडळ पाण्याखाली आहे. वीजेचे सबस्टेशनपासून ते जनरेटरपर्यंत सगळं पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचीही अवस्था वाईट आहे. आमदार निवास ते मंत्र्यांच्या बंगल्यात आणि विधीमंडळात पाणीच पाणी आहे हे सरकारचं अपयश आहे असा आरोपही  मुंडे यांनी केला.

नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होण्यासंदर्भात ज्यावेळी अहवाल मागवण्यात आला त्यावेळी तीन अधिकाऱ्यांची सचिवालय लेवलच्या अधिकाऱ्यांची समिती केली गेली होती. त्या तीन अधिकाऱ्यांच्या समितीने एक मोठा पाऊस आला तर कामकाज होवू शकणार नाही असा अहवाल सरकारला दिला होता परंतु तो अहवाल दाबून ठेवण्यात आला आणि अधिवेशन घेवून विनाकारण केलेला अट्टाहास समोर आला आहे असेही  मुंडे म्हणाले.

Previous articleपावसाच्या  झुळकीने कामकाज बंद करावे लागणे हे सरकारचं अपयश : जयंत पाटील
Next articleअखेर सत्यासमोर सरकार झुकले!: विखे पाटील