राज्यात वीजेचा तुटवडा नाही मागणी एवढी वीज उपलब्ध : ऊर्जामंत्री
नागपूर : राज्यात विजेची जेवढी मागणी आहे, तेवढी वीज उपलब्ध आहे. विजेचा कोणताही तुटवडा राज्यात नाही. उलटपक्षी कमी मागणी असल्यामुळे अनेक वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवावे लागत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
आ. अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. यावर्षी राज्याच्या महावितरण, महापारेषण कंपनीने २३ हजार ७०० मेगावॉट इतकी सर्वोच्च विजेची मागणी पूर्ण करून कोणताही अपघात न होता वीजपुरवठा केला आहे. अमरावती जिल्ह्यात कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची तक्रार आहे. कमी दाबाचा वीजपुरवठा काही भागात केला जातो, असे सांगून ऊर्जा मंत्री म्हणाले- अमरावती जिल्ह्यात ४२४ कोटींची विजेची कामे झाली असून २२५ कोटी पुन्हा देण्यात येत आहे. राज्यात दीनदयाल आणि आयपीडीएस या योजनेअंतर्गत ५ हजार कोटींची कामे सुरु आहेत.
राज्यातील शेतकर्यासाठी अडीच ते साडे तीन हजार मेगावॉट वीज दररोज लागते. ही वीज दिवसा व रात्री पुरवावी लागते. काही भाग दिवसा व काही भाग रात्रीला द्यावा लागते. सर्वांना दिवसाच वीज देण्याचा विचार केला तर यंत्रणेवर अधिक भार येईल व यंत्रणा चालणार नाही, असेही ते म्हणाले.