ठाकरे सरकार मधील “या” कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार मधील पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार  यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे.हे संक्रमण म्हणजे शेवट नाही.यानंतर भविष्यात माझे शेतकरी,कष्टकरी,सामान्य नागरिक यांच्या सेवेकरिता हा सुनील केदार सदैव तत्पर राहील असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यातील ठाकरे सरकार मधील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार  यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.येत्या सोमवारी दोन दिवसाचे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून,अनेक आमदार आणि अधिका-यांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहणा-या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

समस्त जगाला भेडसावनारी जागतिक महामारी कोरोनाने संपूर्ण देशाला सुद्धा विळाख्यात घेतलेले आहे.या महामारीच्या काळात माझ्या शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी व सामान्य नागरिक यांना न्याय देण्याकरिता मागील कित्येक महिन्यापासून सतत  फिरत असता अनेकांशी संपर्क आला असता माझा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला.मागील काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व माझ्या हितचिंतक, अधिकारी यांनी स्वतःची काळजी घेऊन आपली चाचणी करून घ्यावी जेणेकरून आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपण करू शकू.हे संक्रमण म्हणजे शेवट नाही. यानंतर भविष्यात माझे शेतकरी,कष्टकरी, सामान्य नागरिक यांच्या सेवेकरिता हा सुनील केदार सदैव तत्पर राहील.असे केदार यांनी आवाहन केले आहे.