समाजभावना न समजणारे सरकार बालबुद्धीचे – धनंजय मुंडे
परळीतील ठिय्या आंदोलनात घेतला सहभाग
परळी : मराठा आरक्षणाची लढाई प्रतिष्ठेची नाही तर पोटाची आहे. या मुद्यावर सभागृहात अनेकवेळा स्थगन प्रस्ताव मांडला, वेळप्रसंगी सभागृह बंद पाडले पण सरकारला जाग येत नाही अशी खंत राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून परळी येथे ठिया आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यानंतर मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधला तेव्हा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, सरकारने जर दिलेला शब्द पाळला असता तर आज मराठा बांधवांना अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. आरक्षणाच्या मुद्दायवर सरकार किती दिवस चालढकल करणार ते माहिती नाही. पण आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवायचा असे आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले. सरकारवर टिकेची झोड उठवताना अशा बालीशबुद्धीचे सरकार मी कधी पाहिले नाही. समाजभावना जर सरकारला कळत नसेल तर ते सरकार बालिशच म्हणावे लागेल असे ते म्हणाले. आंदोलकर्त्यांना आवाहन करताना मुंडे म्हणाले की, सरकारने कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला, मग त्यात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य देखील असू दे तरी हे आंदोलन शांतपणानेच व्हायला पाहिजे. सामाजाला न्याय मिळावा हिच आपली भावना आहे. सरकार काय बोलले त्याला उत्तर देण्यासाठी आपली लढाई नाही. मोर्चाला गालबोट लागेल असं काही करू नका असे ते म्हणाले. अनेक जण या लढ्यात आपल्या प्रणाची आहुती देत आहेत. हे सरकार तरी शाहाणे होत नाही. सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही आणि परिस्थिती बिथरली तर याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.










