राज्य मागास प्रवर्ग आयोगासोबत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक घ्या

राज्य मागास प्रवर्ग आयोगासोबत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक घ्या

आ. शंभूराज देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे  मागणी

सातारा : मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासंदर्भात केलेली आंदोलने आणि या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण तातडीने थांबविणेकरीता व मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी सर्वपक्षीय मराठा आमदारांची आणि मागास प्रवर्ग आयोगाचे अध्यक्षांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी अशी मागणी शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राव्दारे केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रामध्ये केलेल्या आग्रही मागणीमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात संपुर्ण राज्यामध्ये आजपर्यंत एकूण ५८ मराठा क्रांती मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडले आहेत. मात्र सध्या मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटला असून, शांततेच्या मार्गाने आतापर्यंत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने संपुर्ण राज्यभर हिंसक वळण घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या यासंदर्भात आम्ही सर्वपक्षीय मराठा विधानसभा सदस्य हे विधानसभा सभागृहात तसेच विधानसभेबाहेरही आग्रही राहून आरक्षणासंदर्भातील आमची भूमिका वारंवार शासनापुढे मांडत आलो आहोत.

उच्च न्यायालयाने विचारणा केले प्रमाणे राज्य शासनाने राज्य मागास प्रवर्ग आयोग स्थापन केला असल्याचे म्हणणे उच्च न्यायालयाला दिले असून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागास प्रवर्ग आयोग यांचेकडे प्रलंबीत असून राज्यातील मराठा समाजाला त्यांचे मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून देणेसंदर्भात राज्यातील विधानसभेतील सर्वपक्षीय मराठा आमदारांची उच्चस्तरीय एकदिवसीय बैठक राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांचे समवेत लवकरात लवकर आयोजित करुन या बैठकीत मराठा आमदारांची मराठा आरक्षणासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेऊन मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा याकरीता मागास प्रवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांना विनंती करून हिंसक वळण लागलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी अशी राज्यातील तमाम मराठा आमदारांच्यावतीने आपणांकडे आग्रही विनंती करीत असल्याचे आमदार देसाई यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

Previous articleकाॅग्रेसचे आमदार भारत भालके यांचा राजीनामा
Next articleग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वाढदिवस बाजूला ठेवून केली आंदोलनकर्त्यांशी चर्चा