विखे पाटील यांनी घेतली कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट

विखे पाटील यांनी घेतली कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट

कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने चर्चा

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेऊन विचारवंतांच्या हत्या प्रकरणात कट्टरवादी संघटनाची भूमिका व संबंधित संघटनांवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.

बंगळुरू येथील कर्नाटक विधानसभेत आज  ही भेट झाली. या बैठकीसंदर्भात माहिती देताना विखे पाटील यांनी सांगितले की,कर्नाटकच्या तपास यंत्रणांनी गौरी लंकेश व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी ठोस तपास केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कट्टरवादी संघटना हिंसात्मक कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावेही त्यांच्याकडे आहेत. नजीकच्या काळात कट्टरवादी संघटनांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी ते सकारात्मक असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्टपणे जाणवले.

कर्नाटक एसआयटीने कट्टरवादी संघटनांच्या हिंसक कारवायांविषयी बरीचशी माहिती एकत्रित केली आहे. त्यांच्याकडे ठोस माहिती असल्यानेच महाराष्ट्र सरकारला एटीएसमार्फत धाडसत्र सुरू करणे भाग पडले. अन्यथा भाजप-शिवसेना सरकारने याकडे डोळेझाक करण्याचेच धोरण स्वीकारले होते. सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेला घुमजाव सरकारच्या उदासीन मानसिकतेचे निदर्शक असल्याचे विखे पुढे म्हणाले.

Previous articleसरकारकडून घटना पायदळी तुडविण्याचे काम: छगन भुजबळ
Next articleदेहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी २१२ कोटी आणि सेवाग्राम विकासासाठी १७ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर