देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी २१२ कोटी आणि सेवाग्राम विकासासाठी १७ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी २१२ कोटी आणि सेवाग्राम विकासासाठी १७ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

मुंबई : देहू, आळंदी, पंढरपूर आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. सेवाग्राम विकासासाठी १७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी विविध विकासकामे करण्यासाठी देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी १ हजार ९४ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ७४५ कोटी वितरित केले आहेत त्यापैकी ७११ कोटींची कामे झाली आहेत. यावर्षी नव्याने २१२ कोटी रुपये वितरित केले जातील, या सर्व विकास कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सेवाग्राम, पवनार, वरुड या त्रिकोणाचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण १७० कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. तेथे रस्ते निर्माण, मलनिस्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभीकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरिक्त १७ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभीकरण कामासाठी जे जे आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून याठिकाणी चरखा म्युझिअम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  घाटाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केली.

देहू, आळंदी, पंढरपूर विकासाठी १०९४ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून ७४५ कोटी वितरित झाले असून यावर्षी अजून २१२ कोटी रुपये वितरित केली जातील. पालखी मार्गावर शौचालयांची सुविधा, चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिर परिसर सुधारणा, नवीन बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रीटीकरण, त्याचप्रमाणे वारीकाळात शौचालयांची सुविधा होण्यासाठी खासगी मठ व वाड्यामध्ये शौचालय बांधणे, वाळवंट सुधारणा कार्यक्रम, नामदेव स्मारक उभारणी आदी कामांचा आढावा घेण्यात आला.

पालखी तळाच्या ठिकाणी आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मोबाईल सुरक्षा युनिट नेमण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पुणे व सोलापूर परिसरात या विकास आराखड्याच्या कामासाठी जमीन संपादनाचे काम तातडीने करावे त्यासाठी १५० कोटी रुपये वितरित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleविखे पाटील यांनी घेतली कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट
Next articleडिजीटल इंडियात केबल मोफत मिळत असेल तर पेट्रोल डिझेल दूध फुकट द्या