येत्या २६-२७ ला भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक
मुंबई : आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणूकीची तयारी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तयारीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली असून,त्याचाच एक भाग म्हणून येत्या २६ आणि २७ सप्टेंबरला मुंबईत प्रदेश कार्यकारणीचे आयोजन करण्यात आले आहे. दोनदिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबरला दादर येथिल वसंतस्मृती येथे होणा-या बैठकीला भाजपाचे नेते, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत तर समारोपाला केंद्रीयमंत्री नितिन गडकरी मार्गदर्शन करतील.
२७ सप्टेंबरला वांद्रे येथिल रंगशारदा सभागृहात होणा-या बैठकीला मंत्री,खासदार,आमदार जिल्हाध्यक्ष, महामंत्री आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.संघटन मजबूत करण्याबरोबरच सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती देवून ,जनमानसात पक्षाची असलेली प्रतिमा याबाबतही माहिती घेतली जाणार आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या या बैठकीत पदाधिका-यांशी चर्चा करण्यात येवून,केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.