येत्या सोमवारपासून मुख्यमंत्री घेणार मंत्र्यांची परिक्षा

येत्या सोमवारपासून मुख्यमंत्री घेणार मंत्र्यांची परिक्षा

मुंबई : आगामी निवडणुका आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असून, येत्या सोमवारपासून सलग पाच दिवस विविध खात्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत.त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री यांची एक प्रकारे परिक्षा पार पडणार असल्याची चर्चा आहे.

येत्या सोमवारपासून सुरू होणारा विविध खात्यांचा हा आढावा सह्याद्री अतिथीगृहात घेतला जाणार आहे. गेल्या चार वर्षातील मंत्र्यांची कामगिरी आणि घेतलेले महत्वाचे निर्णय याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः घेणार असल्याने संभावी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर होणा-या परिक्षेमुळे अनेक मंत्र्यांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्व मंत्र्यांना लेखी स्वरूपात आदेश देण्यात आले असून, संबधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्र्यांसह प्रधान सचिव यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.

या आढावामध्ये प्रत्येक खात्यासाठी १५ मिनिटे देण्यात येणार आहेत. दरदिवशी साधारण १० खात्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे कळते.प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना आघाडी सरकारच्या काळातील कामगिरी आणि भाजपा-शिवसेना सरकारच्या गत चार वर्षांतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा मांडण्यास सांगण्यात आला आहे. आढावा घेताना गेल्या चार वर्षांत संबंधित खात्याने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्याचा फायदा आणि अंमलबजावणी या गोष्टींचा विचार केला जाणार आहे. ज्या मंत्र्याकडे एकच खाते आहे. अशा मंत्र्याला १५ मिनिटांचा वेळ, दोन खाती असतील तर त्यांना ३० मिनिटांचा वेळ तर तीन पेक्षा जास्त विभाग असलेल्या मंत्र्यांना ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातही निवडणुका नजरेसमोर ठेवत एक वर्ष आधीपासूनच सर्व विभागांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

Previous articleगुटखा विक्रीचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र
Next articleयेत्या २६-२७ ला भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक