माझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांपुढील संकट महत्वाचे- धनंजय मुंडे

माझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांपुढील संकट महत्वाचे- धनंजय मुंडे

तुघलकी सरकार शेतकर्‍यांना चार्‍यासाठी जनावरांसोबतचा सेल्फीही मागेल- केली बोचरी टीका

अंबाजोगाई : माझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांसमोर असलेल्या दुष्काळाचे संकट महत्वाचे आहे, म्हणुनच मी दिवाळी साजरी न करता तुमच्या व्यथा जाणुन घेण्यासाठी आलो आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने तुम्हाला आधार देणार नाही, त्यामुळे दुष्काळाच्या संकटाचा सामना करतानाच हे शेतकरी विरोधी सरकार उलथुन टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज रहा असे आवाहन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात या वर्षी अभुतपूर्व दुष्काळाचे संकट उभे टाकले आहे. दरवर्षी धनंजय मुंडे हे आपल्या परळी येथील निवासस्थानी दिवाळीचा सण साजरा करतात मात्र या वर्षी दुष्काळाचे संकट मोठे असल्याने दिवाळीचा सण साधेपणाने करताना ऐन दिवाळीत आपल्या परळी विधानसभा मतदार संघातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणुन घेण्यासाठी ते पाच दिवस दुष्काळी भागातील पाहणी, चर्चा आणि संवाद साधणार आहेत, आज त्यांनी आपल्या या दौर्‍याची सुरूवात अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथून केली. जाताना त्यांनी शेतकर्‍यांच्या पाण्याअभावी उद्धवस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर बर्दापूर येथील महादेव मंदिरात परिसरातील ७ गावांतील शेतकरी, दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेताना हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने आपल्याला निसर्गा सोबतच सरकारशीही दोन हात करावे लागणार आहेत, पाच वर्ष केवळ फसवणूकच केली. आताही तेच सुरू आहे, पाणी टंचाई, वीज टंचाई, चारा टंचाई असताना सरकार मोहम्मद तुघलकी निर्णय घेत आहे.

शेतकर्‍यांच्या जनावरांना दावणीला चारा देण्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा सरकारचा निर्णय असाच तुघलकी असून, हे सरकार अनुदानासाठी जनावरांसोबत सेल्फी काढुन पाठवा अशी मागणीही करेल, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली. शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, वीज बील माफ करा, इ.जी.एस. ची कामे तातडीने सुरू करा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क नव्हे तर संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा आदी मागण्या त्यांनी केल्या. सायंकाळी त्यांनी राडी जि.प. गटातील गावांमधील शेतकर्‍यांशीही संवाद साधुन परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेेसचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, माजी सभापती राजेभाऊ औताडे, विलास मोरे, शिवहार भताने, तानाजी देशमुख, सुधाकर शिनगारे, समीर पटेल, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

Previous articleअवनी प्रकरण मुनगंटीवारांना महाग पडणार?
Next articleवाघीण मृत्यू प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे चुकीचे