अवनी वाघिणीला जेरबंद न करता मारण्याचा निर्णय पूर्णतः असमर्थनीय : निरुपम
मुंबई: अवनी वाघिणीला जेरबंद करून पकडणे शक्य असूनसुद्धा तसे न करता, तिला अवैधरित्या शिकाऱ्यांकरवी मारण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय पूर्णतः असमर्थनिय आहे, त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, असे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.
अवनी वाघिणीच्या हत्येच्या विरोधात आज मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे प्राणिप्रेमी संघटना आणि सामाजिक संस्थांतर्फे ‘ग्लोबल मार्च’ काढण्यात आला होता. त्यावेळेस ते बोलत होते.या ग्लोबल मार्चमध्ये संजय निरुपम यांच्यासोबत माजी खासदार प्रिया दत्त, विरोधी पक्षनेते रवी राजा, सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली, अनेक प्राणी प्रेमी संघटना, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निरुपम पुढे म्हणाले की, ओरिसा मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. जे लोक मारले गेले, त्यांच्याबद्दल मला सुद्धा सहानुभूती आहे. पण त्या वेळेस त्या वाघाला जेरबंद करून पकडण्यात आले. त्याला मारले नाही. अवनी वाघिणीलाही अशा प्रकारे पकडून जेरबंद करण्याची गरज होती. पण त्यांनी तसे न करता तिची शिकाऱ्यांकरवी हत्या केली. याची जितकी निंदा करावी तितकी थोडीच आहे. वनमंत्री असल्याच्या नात्याने नैसर्गिक वन संपत्तीचे व वन्यजीवांचे जतन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांनी त्यांची जबाबदारी नीट सांभाळली नाही. त्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे, अन्यथा हे आंदोलन असे सुरू राहील.