भाजपच्या विकासाच्या गॅसचे फुगे फुटले : उद्धव ठाकरे

भाजपच्या विकासाच्या गॅसचे फुगे फुटले : उद्धव ठाकरे

मुंबई:कर्नाटकने औद्योगिक आघाडीत महाराष्ट्राला मागे टाकल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखातून पुन्हा भाजपला झोडपले आहे.

कर्नाटकने झेप घेतल्याचे दु:ख नाही, पण महाराष्ट्र का घसरला, याचा खेद असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.भाजपच्या राज्यात विकासाच्या अजगराचे वेटोळे फक्त मेट्रो भोवतीच पडले आहे. बाकी राज्यात पाणी टंचाई आहे, वीज तुटवडा आहे. महाराष्ट्रात।भाजपचे काम कमी आणि बोलणे जास्त आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अग्रलेखात म्हटले आहे की, जगभरातील राष्ट्रप्रमुखांना मोदी गुजरातेत नेऊन आपल्चा राज्याचे मार्केटिंग करतात. पण तेथेही बुलेट ट्रेन सोडली तर एकही नवा प्रकल्प आला नाही. मागासलेपणाचा दावा करत विदर्भातील विकासाचा गाजावाजा केला, पण तेथेही उद्योग आले नाहीत, असेही शिवसेनेने म्हटले आहे. मुंबईचे अनेक प्रकल्प गुजरातला नेऊन मुंबईचे औद्योगिक महत्व कमी केले आहे, असा आरोपही शिवसेनेने भाजपवर केला आहे. केवळ मेट्रो म्हणजे समृद्घी आणि प्रगती नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला. विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरीही ते फुटतातच. गुजरातेत साडेचार हजार कोटी रुपये खर्च करुन पटेलांचा पुतळा उभारला, पण महाराष्ट्रात शिवरायांचा पुतळा उभारण्यास मुहुर्त मिळत नाही, अशी बोचरी टीका अग्रलेखातून केली आहे.

Previous articleअवनी वाघिणीला जेरबंद न करता मारण्याचा  निर्णय पूर्णतः असमर्थनीय : निरुपम
Next articleवाघिण हत्येवरुन कॉंग्रेसमधील मतभेद उघड