वाघिण हत्येवरुन कॉंग्रेसमधील मतभेद उघड
विजय वडेट्टीवारांकडून मुनगंटीवारांची पाठराखण
नागपूर: अवनी वाघिणीच्या हत्येवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कॉंग्रेस आणि शिवसेनेने घेरले आहे. परंतु आता या मुद्यावर कॉंग्रेसमधील मतभेद उघड झाले आहेत. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांची पाठराखण केली असून वाघांपेक्षा माणसांचा जीव मोलाचा असल्याचे म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वाघिण हत्येवरुन मुनगंटीवारांवर कडक टीका केली. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुनगंटीवारांचे तस्करांशी संबंध असल्याचा आरोप केला. परंतु विदर्भातील कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांना पाठिंबा दिला आहे.
वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांनाच विरोध केला. तसेच मुनगंटावारांच्या कृतीचे समर्थन केले. वाघाच्या जिवापेक्षा शेतकऱ्याचा जीव महत्वाचा आहे. शेतकरी जीव मुठीत धरुन जगत असतात. वाघ जगला पाहिजे ही भूमिका योग्य असली तरीही माणूस जास्त महत्वाचा आहे, असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे नेते मुनगंटीवारांना लक्ष्य करत असताना वडेट्टीवार यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.