बेपत्ता मुलींचा शोध न घेतल्यास ‘तुम्हाला’ बेपत्ता करू : शालिनी ठाकरे

बेपत्ता मुलींचा शोध न घेतल्यास ‘तुम्हाला’ बेपत्ता करू : शालिनी ठाकरे

विशेष कृती दल नेमण्याची मागणी

मुंबई: मुंबईतून बेपत्ता झालेल्या मुलींची भयावह आकडेवारी समोर आल्यानंतर मनसेने मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. या मुलींचा शोध न घेतल्यास महिलाच तुम्हाला वर्षा बंगल्यातून बेपत्ता करतील, असा हल्ला मनसे सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी चढवला.

२०१३ पासून आतापर्यंत मुंबईतून सव्वा दोन हजार मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी फडणवीस यांनीच विधीमंडळात दिली होती. त्यावर संतप्त झालेल्या शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील महिला मुख्यमंत्र्यांना भाऊ मानतात आणि दरवर्षी राखीही बांधतात. पण मुख्यमंत्र्यांना या नात्याचा विसर पडला आहे. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.

शालिनी ठाकरे म्हणाल्या की, सव्वा दोन हजार मुली कुठे गेल्या याचा तपास लागत नाही. याहून अधिक शरमेची गोष्ट नाही. यामागे मानवी तस्करांची टोळी आहे का? राज्याचे गृह खाते आणि पोलिसांना पाच वर्षात मुलींचा शोध लावता येत नसेल तर राज्य महिला आयोग त्याची दखल का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला.

टेस्टा या संघटनेनुसार मुंबई आणि नागपुरातून बेपत्ता झालेल्या मुलींची परदेशात विक्री होते. महाराष्ट्र मानवी तस्करीत प्रमुख केंद्र होत आहे. पण याची कल्पना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांना नसावी. बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या फेकाड्या भाजप सरकारला बेपत्ता मुलींबद्दल काही सोयरसुतक नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Previous articleमे महिन्यातील टँकरची आकडेवारी तपासा आणि जाहीर करा: केशव उपाध्ये
Next articleआरक्षणाच्या मागणीसाठी आ. प्रकाश गजभिये महाराजांच्या वेषात !