बोफोर्स घोटाळ्याचा कलंक मिटवण्यासाठी खोटे आरोप :पूनम महाजन

बोफोर्स घोटाळ्याचा कलंक मिटवण्यासाठी खोटे आरोप :पूनम महाजन

पुणे: गांधी घराण्यावरील बोफोर्स घोटाळ्याचा कलंक मिटवण्यासाठीच राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर राफेल प्रकरणात खोटे आरोप करत आहेत, अशी टीका भाजप खासदार पूनम महाजन यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानेही राफेल खरेदीत घोटाळा झाला नसल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी खोट्या माहितीच्या आधारे आरोप करत असल्याचे त्या म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी खोटी माहिती देणारे आपले खबरी कोण आहेत, ते स्पष्ट करावे, असेही पूनम महाजन म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसकडून राफेल खरेदी प्रकरणी चौकीदार चोर है अशी जोरदार टीका सुरू आहे. कॉंग्रेसला राफेलबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी संसदेत चर्चा करावी. परंतु संसदेच्या बाहेर आरोप करून राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत, अशी जोरदार टीका महाजन यांनी केली.

कॉंग्रेसकडून राफेल घोटाळ्यासंदर्भात सुरू असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपने देशभरात ७० पत्रकार परिषदा घेण्याची रणनीती आखली असून त्यानुसार महाजन यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पूनम महाजन या भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी मोदी यांच्याविरोधात रान उठवले असून राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांमध्ये हा मुद्दा प्रमुख बनवला होता. त्याचा फटकाही भाजपला काही प्रमाणात बसला असून आक्रमक प्रचाराला तसेच उत्तर देण्याची तयारी भाजपने केली आहे.

Previous articleधनगर आरक्षणावरून राज्य सरकार तोंडघशी
Next articleफडणवीस सरकारने धनगर समाजाला फसवले : खा.सुप्रिया सुळे