फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसवले : खा.सुप्रिया सुळे

फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसवले : खा.सुप्रिया सुळे

मुंबई :  राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असता जनजातीय कार्यमंत्रालयाने यावर उत्तर देताना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रस्तावच पाठवलेला नाही असे स्पष्ट केले.

सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळले नाही.निवडणूकीनंतर तातडीने हा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठविला असता तर आत्तापर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान मिळाले असते. देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत प्रस्ताव न पाठवून खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दाखवून दिले असल्याचा आरोप खासदार  सुळे यांनी केला.

धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही आणि या मुद्दयावर धनगर समाजाची फसवणूक होत असल्याची प्रचिती आज संसदेत आली. सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळलेले नसून धनगर समाजाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे असेही खासदार  सुळे म्हणाल्या.

 

Previous articleबोफोर्स घोटाळ्याचा कलंक मिटवण्यासाठी खोटे आरोप :पूनम महाजन
Next articleशिवसेनेबरोबर आम्हाला युती हवी आहे:गडकरी