शिवसेनेबरोबर आम्हाला युती हवी आहे:गडकरी

शिवसेनेबरोबर आम्हाला युती हवी आहे:गडकरी

मुंबई:शिवसेनेबरोबर कुरबुरी होत असल्या तरी आम्हाला शिवसेनेबरोबर युती हवी आहे. शिवसेनेसोबत आमचे दृढ संबंध आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. परंतु २०१४ ला युती तुटल्यापासून दुरावा निर्माण झाला. हिंदुत्व हा आम्हा दोन्ही पक्षांमधील युतीचा आधार आहे. भाजप आणि शिवसेनेत कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत, असा दावाही गडकरी यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत आरती केली. याबाबत गडकरी म्हणाले की, शिवसेनेशी आम्हाला युती हवी आहे. त्यांनी सत्ताधारी म्हणून भूमिका बजावायची की विरोधकाची, हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

शिवसेना केंद्र आणि राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असली तरी सरकारवर आणि भाजपवर सातत्याने धारदार टीका सामनातून तसेच प्रत्यक्षातही करत असते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्र्यांनीही वारंवार शिवसेनेसोबत युतीची इच्छा बोलून दाखवली असली तरीही शिवसेनेने प्रतिसाद दिलेला नाही. मात्र नितीन गडकरी यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका सौम्य असल्याचे अनेकदा दिसले आहे. गडकरी यांच्यावर फारशी टीकाही केली जात नाही. त्यामुळे गडकरी यांनी केलेल्या आवाहनास शिवसेना पक्षप्रमुख कसा प्रतिसाद देतात, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Previous articleफडणवीस सरकारने धनगर समाजाला फसवले : खा.सुप्रिया सुळे
Next articleमनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा