राणेंची हकालपट्टी करा :भाजपची मागणी

राणेंची हकालपट्टी करा :भाजपची मागणी

कणकवली: भाजपच्या कोट्यातून खासदार होऊनही भाजपवरच टीका करणारे नारायण राणे यांची खासदारपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सिंधुदुर्ग भाजपने केली आहे. भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोजिनी पांडे यांना जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यावर स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली असली तरीही ते भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. जठार म्हणाले की, विश्वास यात्रेदरम्यान राणे यांनी भाजपवरच जोरदार टीका केली आहे. पक्षाकडून खासदारकी घ्यायची आणि पक्षावरच टीका करायची अशांना भाजपमध्ये स्थान नाही, असे ते म्हणाले. मध्यंतरी आपण जिल्ह्यात नव्हतो. नाही तर दोन महिन्यापूर्वीच राणे यांच्या हकालपट्टीचा ठराव जिल्हा कार्यकारिणीत मंजूर करून घेतला असता. यापुढे राणेंनी भाजपवर टीका केली तर राणे यांच्या हकालपट्टीचा ठराव घेऊन तो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पाठवला जाईल. राणे यांनी काढलेल्या विश्वासयात्रेत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राणे यांना टीका करायची असेल तर अगोदर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जठार यांनी केली.

नाणार रिफायनरीला शिवसेनेच्या विरोधाबाबत ते म्हणाले की आज जे रिफायनरीला विरोध करत आहेत तेच हा प्रकल्प सुरू करा, असे सांगताना दिसतील.राणे यांच्याविरोधात आता भाजपमधूनही विरोधी सूर उमटत आहे. भाजप राणेंबाबत काय निर्णय घेतो, हे पाहण्याची उत्सुकता आहे.

Previous articleशिवसेनेशी जाहीर वाद टाळा : अमित शहा
Next articleविधानसभेसाठी शिवसेनेची १५५ जागांची मागणी