विधानसभेसाठी शिवसेनेची १५५ जागांची मागणी
मुंबई:आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप वारंवार शिवसेनेकडे आग्रह धरत आहे. परंतु अद्याप भाजपच्या विनंतीला शिवसेनेने प्रतिसाद दिला नव्हता. पण एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेने विधानसभेसाठी १५५ जागांची मागणी केली आहे. भाजपने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरच युती होईल, असेही सेनेकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेच्या इतर कोणत्या मागण्या आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेच्या मागणीला भाजप काय प्रतिसाद देतो, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपची अवस्था बिकट झाली आहे.भाजपला मित्रपक्ष सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे कदाचित भाजप शिवसेनेची मागणी मान्य करण्याची शक्यता आहे, असेही या वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल रात्री उशिरा अडीच तास भाजप नेत्यांची बैठक घेतली. शिवसेनेच्या टीकेला उत्तर देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्यावरून युतीसाठी भाजप कोणतीही तडजोड करण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेने मौके पे चौका मारण्याची खेळी केली आहे, अशी चर्चा आहे.
येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडी मात्र वेगात होण्याची चिन्हे दिसत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायम शिवसेनेला नाराज न करण्याची भूमिका घेतली आहे. युती करण्यासाठी मुख्यमंत्री अत्यंत आग्रही आहेत, असेही बोलले जाते. भाजपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.











