मुंबई नगरी टीम
मुंबई: डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून प्राणघातक शस्रसाठा सैपडल्याने खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. राज्यात भाजप पदाधिकारीच गुंड आणि दहशतवाद्यांची कामे करू लागले आहेत, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की,भाजप पदाधिकारीच जर बेकायदेशीरपणे शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही.त्यांची कामे भाजपचेच पदाधिकारी करू लागले आहेत असे दिसत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. येणाऱ्या काळात भाजप कशा प्रकारे राज्य सांभाळणार आहे हेच यातून पहायला मिळते आहे. या शस्त्रांद्वारे राज्यात कोणत्या प्रकारच्या दंगली भाजपला घडवायच्या होत्या, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
कुलकर्णी यांच्या दुकानातून पोलिसांनी चाकू,एअरगन,सुरे,चॉपर आदी शस्रे मोठ्या प्रमाणावर जप्त केली आहेत.धनंजय कुलकर्णी हे भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत.त्यांना आता अटक करण्यात आली आहे. अद्याप भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही.