दुष्काळ निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटी वितरित

मुंबई नगरी टीम

मुंबई : २०१५ साली घोषित केलेल्या दुष्काळानंतर ४५ महिन्यात दुष्काळ निवारण्यासाठी  मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटी वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस  मुख्यमंत्री सचिवालयाने ही माहिती दिली आहे. सद्यस्थितीला ३७ कोटी रुपये शिल्लक आहेत.

महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दुष्काळ आहे. अश्या परिस्थितीत २०१५ साली घोषित केलेल्या दुष्काळानंतर मुख्यमंत्री सहायता निधीत एकूण जमा आणि वितरित केलेल्या निधीची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मागितली होती. मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहाय्यक लेखाधिकारी मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांस मागील ४५ महिन्यांची माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३२ कोटी २१ लाख ३० हजार ३३१ रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले तर ६० लाख रुपये वितरित करण्यात आले. वर्ष २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात २८ कोटी ५३ लाख ३ हजार ७४ रुपये जमा झाले आणि शासनाने ३० कोटी ५० लाख वितरित केले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५ कोटी ६१ लाख ३६ हजार ८२६ रुपये प्राप्त झाले आणि ७ कोटी ९५ लाखांचे वितरण करण्यात आले. १ एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत १ कोटी १५ लाख ७२ हजार ५३० रुपये जमा झाले तर ११ कोटी ४५ लाख ५२ हजार रुपये शासनाने वितरित केले. दुष्काळ घोषित झाल्यापासून ते आजपर्यंत ८७ कोटी ५१ लाख ४२ हजार ७६१ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दुष्काळासाठी जमा झाली होती ज्यापैकी शासनाने ५० कोटी ५० लाख ५२ हजार रुपये वितरित केली आहे आणि सद्यस्थितीला ३७ कोटी ९० हजार ७६१ रुपये शिल्लक आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाने निधी वितरित ज्याठिकाणी करण्यात आला आहे त्याची तपशीलवार माहिती न देता दुष्काळ निवारण्याच्या कामासाठी जिल्हाधिका-यांकडून जसजशी निधीची मागणी प्राप्त होते त्याप्रमाणे संबंधित जिल्हाधिका-यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येतो असे मुख्यमंत्री कार्यलयाने कळविले असेही गलगली यांनी सांगितले.

Previous articleमराठी मराठी म्हणत शिवसेनेने मराठी माणसालाच लुटले :अंजली दमानिया
Next articleडान्सबार प्रकरणी सरकार बाजू मांडण्यात कमी पडले : विद्या चव्हाण