राज्यात दुष्काळ जाहीर करा ; जयंत पाटील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या पार्श्नभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त करीत राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात दुष्काळ जाहीर करुन त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली

पाटील आपल्या पत्रात म्हटले की,राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या २९ टक्के पाऊस ठराविक ठिकाणी झाला आहे.सद्यःस्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. तिथे सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे असे त्यांनी सांगितले.एकंदरीत राज्यातील ब-याच भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करीता, बियाणे,रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या खर्चाचा परतावा परत मिळेल का नाही अशी शंका त्यांनी पत्रात उपस्थित केली आहे.

खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून चारा पिकांचे देखील नुकसान झाले आहे, जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याचे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पावसा अभावी सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणांत पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही.तसेच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राज्यात आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी वर्तविली आहे. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करुन त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

Previous articleपंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? पण….राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना !
Next articleशरद पवार यांनी सिंचन घोटाळावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आव्हान