शरद पवार यांनी सिंचन घोटाळावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । इंडिया या विरोधी पक्षांच्या नेत्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत होत असून, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली.मुंबईतील दोन दिवसांच्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तसेच आघाडीचा संयुक्त कार्यक्रम ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही आणि पंतप्रधान मोदी यांनी राज्य सहकारी बँक,सिंचन घोटाळावरून आरोप केले होते.पंतप्रधानांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि देशाला काय सत्य परिस्थिती आहे ते सांगावे असे आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे.या बैठकीला सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज या बैठकीचा आढावा घेतला.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला.पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.यावेळी शरद पवार म्हणाले की,इंडिया आघाडीच्या पहिल्या दोन झालेल्या बैठका महत्त्वपूर्ण होत्या.मुंबईत होणा-या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होवू शकते तर पुढील बैठकींमध्ये इंडिया आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमाबाबत चर्चा होईल.आघाडीतील काही नेत्यांची समिती स्थापन करून राज्यनिहाय स्थानिक पातळीवर आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवली जाऊ शकते, असे पवार यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरुन भोपाळ येथील भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.मोदी यांनी राज्य सहकारी बँक, सिंचन घोटाळावरून आरोप केले होते. पंतप्रधानांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि देशाला काय सत्य परिस्थिती आहे ते सांगावे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केले.जे सहकारी सोडून गेले त्यांना जनता मतदानाच्या वेळी जागा दाखवतील,असेही पवार यावेळी म्हणाले.बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले असल्याचेही पवार यांनी म्हटले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबईत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा हा डाव असून, भाजपाचा मनसुबा उघड झाल्याचे सांगितले.महाविकास आघाडीच्या काळात असा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती.आत्ताही आम्ही हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतानाच ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.केवळ एक दिवसाच्या महिलांना शुभेच्छा नको तर प्रत्येक दिवशी सर्व महिलांना सुरक्षित वाटायला हवे. तशी स्थिती देशात आणि राज्यात नाही.हिंगोलीच्या सभेत भाजपने मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घ्या असे मी म्हटले होते. त्यानुसार बिल्कीस बानो, मणिपूरच्या त्या दोन महिला आणि कुस्तीपटूंना राखी बांधा असे आवाहन केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमची विचारधारा वेगळी असली तरी देशाचे रक्षण आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला विकास आणि स्वातंत्र्य हवे आहे त्यापैकी स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे त्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही ठाकरे म्हणाले. लोकशाहीसाठी वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.भारतमातेच्या पायात कुणालाही बेड्या घालू देणार नाही.

केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आल्यावर त्यांचे हे जे काही पाश आहेत ते तोडून टाकू.मुंबईची स्वायतत्ता, महाराष्ट्राची आणि प्रत्येक राज्याची स्वायतत्ता आम्ही अबाधित ठेवू असेही ठाकरे म्हणाले. याची सुरुवात दिल्लीपासून केली. दिल्लीसाठी केंद्राने जेव्हा वटहुकूम आणला तेव्हाच मुंबईबाबतही असे काही करतील अशी शंका आली होती.केंद्रातील सरकार संघराज्य पद्धतीचे सरकार असते. प्रत्येक राज्याल्या समान अधिकार आहे.काही मोजक्या गोष्टी सोडल्या तरच केंद्राला हस्तक्षेप करता येतो. मात्र हा हस्तक्षेप मोदी सरकार वाढवायचा आहे. त्यामुळे राज्यांची आणि शहरांची स्वायतत्ता मोडून एकछत्रीपणा आणायचा आहे मात्र ही छत्री आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आल्यावर आम्ही मोदी सरकारचे उफराटे निर्णय फिरवल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Previous articleराज्यात दुष्काळ जाहीर करा ; जयंत पाटील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleमहाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकून केंद्रात मोदींचे सरकार आणण्याचा संकल्प