विमानतळाशेजारील १५ एक्करचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा मनपाचा डाव: मुंडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या ७० हजार चौरस मिटरच्या म्हणजेच सुमारे १५ एकरापेक्षा अधिकचा ८ हजार कोटी खुला भुखंड विकासकांच्या घशात घालण्याचा डाव मुंबईच्या विकास आराखड्याच्या माध्यमातुन मुंबई महानगरपालिकेने घातला असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मुंडे यांनी आज या सदर ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या विनंतीवरून  आज भेटी दिली त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रकरणी१९९२ च्या विकास आराखड्यात  अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खुली जागा राखीव म्हणुन ठेवण्यात आली होती. तथापि, सदरचे क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय विमातळालगत असल्यामुळे त्यापैकी ५० टक्के क्षेत्र हे हॉटेल या प्रयोजनार्थ राखीव ठेवण्याचा निर्णय सन १९९२ मध्ये घेण्यात आला होता. संबंधित १५ ते १६ एकर क्षेत्र हे खुली जागा म्हणुन कायम ठेवण्याची अट घालण्यात आली होती व सदरचे खुले क्षेत्र हे जनतेसाठी उपलब्ध ठेवण्याची अटदेखील घालण्यात आली होती. याठिकाणच्या मे. इंडियन हॉटेल्स प्रा.लि., मे.मार्लबरो हॉटेल  व  मे. नारंग हॉटेल प्रा.लि. यासारख्या हॉटेल्सनी सदरची खुली जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली तसेच जे ५० टक्के म्हणजेच १५ ते १६ एकर जागा फक्त खुली जागा या प्रयोजनार्थ ठेवण्यात आली होती त्याठिकाणी द ऑर्ब नावाची व्यवसायीक इमारत बेकायदेशीररित्या बांधली असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

मुंबईच्या सध्या मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सदरच्या खुल्या जागा ताब्यात घेण्याऐवजी तेथील ८० टक्के क्षेत्रावरचे आरक्षण बदलुन ते हॉटेल व व्यवसायीक असे केले व यासर्व जागा संबंधितांच्या घशात घातल्या. तसेच हॉटेल आरक्षण असलेल्या आरक्षणावर फक्त हॉटेल व कमर्शिअल असे आरक्षण बदलून द ऑर्ब या बेकायदेशीर कमर्शिअल इमारतीला कायदेशीरपणे कायदेशीर केले. यासर्व प्रकरणांत सबंधितांना २१ ते २५ लाख चौरस फुटाचे बांधकाम विक्रीला उपलब्ध होणार असुन हा सर्व घोटाळा ६ ते ८ हजार कोटी रूपयांच्या घरात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

याप्रकरणी मुंडे यांनी  तात्काळ द ऑर्ब या बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करण्याचे तसेच सदरचा १५ एकरापेक्षा अधिकच्या खुले, खेळाचे मैदानासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावरील आरक्षण हॉटेल व कमर्शिअल असे बदलण्यात आले आहे ते तात्काळ रद्द करून सदरचे भुखंड महानगरपालिकेस ताब्यात घेण्याचे आदेश द्यावेत व तेथील सर्वसामान्य जनतेस उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Previous articleखडसेंच्या पक्षांतराची राष्ट्रवादीला प्रतिक्षा
Next articleमागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डावः चव्हाण