डान्‍सबार बंदीबाबत सरकार अपयशी : विखे पाटील

डान्‍सबार बंदीबाबत सरकार अपयशी !: विखे पाटील

मुंबई : डान्सबार सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी शिथील करून दिलेली परवानगी हे  राज्य सरकारचे मोठे अपयश असून,याबाबत सरकारकडून करण्यात आलेले दावेही फोल ठरल्याने सरकाची भूमिका प्रामाणिक नव्हती हे स्पष्ट झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सुप्रिम कोर्टाने डान्स बार सुरू करण्यास दिलेल्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, डान्स बार सुरू होवू नयेत म्हणून न्यायालयात बाजू मांडण्यास सरकार अपयशी ठरले आहे. डान्सबार बाबत पुन्हा सुरू होवू नयेत सरकारने घातलेल्‍या नियम व अटी सुध्दा न्यायालयाने रद्द केल्या. याचाच अर्थ आपली भुमिका मांडण्‍यात सरकार अपयशी ठरले असुन यातुन ते याबाबत फारसे गंभीर नव्हते हे सिध्द झाल्‍याचे विरोधी पक्षनेते म्‍हणाले.

डान्सबार संदर्भात विधानसभेत आणि सभागृहाबाहेर झालेल्‍या चर्चेचा संदर्भ देवून, विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री याबाबत अनेक दावे करीत होते. पण डान्‍सबार बाबत सरकारने आजवर घेतलेली मवाळ भुमिका पाहता सरकारमधील काही लोकांची डान्‍सबार मालकांशी हात मिळवणी असल्‍याचे दिसुन येते. स्व. आर. आर. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून,डान्‍सबारबंदीचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाबाबत सरकार गंभिर नसल्‍यामुळेच ही वेळ उद्भवली असुन, याची जबाबदारी आता मुख्‍यमंत्र्यांनीच घ्‍यावी, असेही विखे पाटील यांनी म्‍हटले आहे.

Previous articleरबर उद्योगामुळे भारताच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार : सुरेश प्रभू 
Next articleदिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार- राजकुमार बडोले