शेतकऱ्यांच्या दस्तनोंदणीद्वारे ५ कोटी पेक्षा जास्तीची शुल्कमाफी

मुंबई नगरी टीम

मुंबई । सलोखा योजनेतून आतापर्यंत राज्यातील ५८५ शेतकऱ्यांना लाभ घेतला असून, या दस्त नोंदणीद्वारे एकुण ५ कोटी, १२ लाख, ४० हजार, ९६३ रुपयांची शुल्कमाफी करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्याच्या ७ विभागातील ५८५ दावे सलोखा योजने अंतर्गत निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक १४४ दावे निकाली काढण्यात आले, त्या पाठोपाठ लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नागपूर व पुणे विभागाचा समावेश आहे. सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून, विविध न्यायालयात प्रलंबित दावे सलोख्याने निकाली निघत आहेत असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सलोखा योजना आणण्यात आली आहे.या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल, तर अशा शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत दस्तनोंदणीच्या अदलाबदलासाठी मुद्रांक शुल्क १ हजार रुपये आणि नोंदणी फी १ हजार रुपये आकारण्यात येईल.शेतजमिनीच्या संदर्भातील वाद सलोखा योजनेमुळे मिटत असून, शेतकऱ्यांमध्ये सौख्य आणि सौहार्द्याची भावना निर्माण होत आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

Previous articleठाकरे पवारांची पुन्हा कसोटी; विधानपरिषदेतील तब्बल २० आमदारांची मुदत संपणार
Next article‘ताक जरी असले, तरी फुंकून फुंकून प्यायचे’…प्रकाश आंबेडकरांची सावध भूमिका