खूषखबर : पुढील दोन महिन्यात तब्बल ३० हजार शिक्षकांची भरती करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज १ सप्टेंबरपासून भरतीसाठी पवित्र पोर्टल प्रणाली खुली झाली असून,पात्र उमेदवारांची पवित्रवर नोंदणी सुरु करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. येत्या २० सप्टेंबरनंतर पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यात एकूण ३० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असेही केसरकरांनी स्पष्ट केले.केसरकर यांच्या या निर्णयामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छूकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती मागील अनेक वर्षापासून रखडली आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या संचमान्यतेनुसार राज्यात ६७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्यातील ८० टक्के म्हणजेच ५५ हजार पदे आगामी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी भरण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण, संचमान्यता, बिंदूनामावली आदी बाबींवर काम करत असल्याने भरती रखडली असल्याने भावी शिक्षकांत व उमेदवारांत नाराजी होती.अखेर या शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाल्याने इच्छूकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि खासगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाईल. तर, दुसऱ्या टप्प्यात २० ते २५ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. पवित्र पोर्टल आज १ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यावर उमेदवारांनी आपली अद्यावत माहिती भरून स्वंयनोंदणी करावी. त्यानंतर पोर्टलवर जाहिरात प्रकाशित करून उमेदवारांना ‘टेट’ परीक्षेतील गुणांनुसार प्राधान्यक्रम दिला जाईल.जिल्हा परिषदेतील नियुक्त्या थेट गुणांद्वारे केल्या जातील.तर खासगी संस्थांना मुलाखतीशिवाय व मुलाखत घेऊन असे दोन पर्याय दिले आहेत. एका जागेसाठी ३ उमेदवारांना मुलाखतीला संधी मिळेल.मुलाखतीसाठी ३० गुण असणार आहेत. शिक्षणाधिकारी व इतर एक शासकीय अधिकारी आणि संस्थांचालकाचे प्रतिनिधी उमेदवारांची मुलाखत घेतील. त्यानंतर शालेय विभागाकडून उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकून केंद्रात मोदींचे सरकार आणण्याचा संकल्प
Next articleशक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही तिथे नरेंद्र मोदी काय करणार ?