शरद पवार उतरले मैदानात ! मविआच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीच आज कोल्हापूर, हातकणंगले,रावेर, बारामती,शिरूर,सातारा व माढा या सात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय लवकरच होईल,महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता जिद्दीने कामाला लागा असा आदेश शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सुरूवात केली.आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर, हातकणंगले,रावेर, बारामती, शिरूर,सातारा व माढा या सात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.यावेळी सर्व लोकसभा मतदारसंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघाची माहिती महाविकास आघाडी व महायुतीतील सद्यस्थिती पक्षाच्या वरिष्ठांच्या समोर मंडळी.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेतील काही नेते जरी विद्यमान सरकार मध्ये सामील झाले असले तरी मतदार महाविकास आघाडी सोबतच आहे असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिला.पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शरद पवार यांनी राज्य सरकारच्या अपयशांचा पाढा वाचून दाखवला तसेच कार्यकर्त्यांनी या सरकारचे अपयश जनतेसमोर निर्भीडपणे मांडले पाहिजे अशी सूचनाही पवार यांना केल्या.आघाडीतील जागा वाटप लवकरच होईल.पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता जिद्दीने कामाला लागले पाहिजे असा आदेश पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणू अशी गवाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, आ. एकनाथ खडसे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.बाळासाहेब पाटील आ. अनिल देशमुख, आ. अशोक पवार, कोषाध्यक्ष हेमंत टाकले, विद्याताई चव्हाण, रवींद्र पवार, बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजपुरकर आदी नेते उपस्थित होते.

Previous articleमंत्री धनंजय मुंडेंनी करून दाखवलं ! स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या मित्राला दिली पुन्हा संधी
Next articleकंत्राटी भरतीचे पाप शरद पवार,उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे : देवेंद्र फडणवीसांचा घणाघात