पदवीधर,शिक्षक निवडणूक : कुठं बंडखोरी तर काही ठिकाणी अपक्षांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकंदुखी वाढली

मुंबई नगरी टीम

मुंबई । नाशिक,अमरावती पदवीधर तर औरंगाबाद,नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार असून,आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.या मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.नाशिक,अमरावती पदवीधर मतदार संघासह औरंगाबाद,नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघात उमेदवारांची संख्या मोठी आहे.औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे.

नाशिक,अमरावती पदवीधर तर औरंगाबाद,नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर या पाचही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील आणि माविआचे धीरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या लढत होणार आहे.औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.तर नागपूर शिक्षक मतदार संघात भाजपा पुरस्कृत उमेदवार नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात खरी लढत होईल.

नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.कोकण शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेतले. औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून एकुण १५ उमेदवारांचे ३० अर्ज पदाखल झाले होते.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण २७ अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Previous articleमुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या
Next articleनाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ? उद्या होणार फैसला