‘तो’ नकोसा बंगला शिंदे गटातील मंत्र्यांच्या पदरी,कोणत्या मंत्र्यांना कोणत्या बंगल्याचे झाले वाटप ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री राहिलेले एकनाथ खडसे यांना मिळालेला रामटेक बंगला हा त्यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्यामुळे सोडावा लागला होता.त्यानंतर याच बंगल्यात राहिलेले तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याच बंगल्या शेवटचा श्वास घेतला होता.ठाकरे सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्रीपद भूषवलेले छगन भुजबळ यांना अडीच वर्षात रामटेक बंगला सोडावा लागला होता.आता हाच बंगला शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या वाट्याला आला आहे.शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना आज बंगल्याचे वाटप करण्यात आले.त्यानंतर या नकोशा असलेल्या बंगल्यावरून आता नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होवून १५ दिवस उलटल्यानंतर आज अखेर १८ पैकी १६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.राज्याच्या राजकीय इतिहासात मंत्र्यांच्या दृष्टीने ‘नकोसा’ असलेला रामटेक बंगला हा शिंदे गटाचे मंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाट्याला आला आहे.यापूर्वी वास्तव्यास असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेला रॉयल स्टोन बंगला हा आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वितरीत करण्यात आला आहे.समुद्र किनारी असलेला रामटेक हा बंगला मिळविण्यासाठी यापूर्वी अनेक मंत्री आटापिटा करीत असे मात्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून राहिलेले एकनाथ खडसे यांना घोटाळ्यांच्या आरोपामुळे रामटेक सोडावा लागला होता. त्यांनतर या रामटेक बंगल्यात वास्तव्यास असलेले फडणवीस सरकारमधिल कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे पुढे निधन झाले.त्यामुळे रामटेक बंगला घेण्यास कोणताही मंत्री पुढे येत नव्हते.राज्यात ठाकरे सरकार आल्यावर छगन भुजबळ यांच्या वाट्याला हा बंगला आला मात्र अडीच वर्षानंतर ठाकरे यांना सत्ता सोडावी लागल्याने भुजबळांना हा बंगला सोडावा लागला.प्रत्येकाला नकोसा असलेला हा रामटेक बंगला शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला जाणार याची चर्चा होती.मात्र हा रामटेक बंगला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाट्याला गेला आहे.

शिवसेना भाजप आणि कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे १९९५ आणि १९९९ मध्ये रामटेक हा बंगला तत्कालीन उपमुख्यमंत्री अनुक्रमे गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी आपल्याकडे ठेवला होता. मात्र, त्यानंतर तेलगी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर भुजबळ मंत्रिपदावरून पायउतार झाले तरी २००२-०३ नंतर मंत्री नसताना भुजबळ यांचा मुक्काम रामटेकवर होता. २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्ष भुजबळ रामटेक होते. मात्र, २०१४ नंतर रामटेक मुक्कामी जाणाऱ्या मंत्र्यांचे राजकीय ग्रह फिरू लागले.आज शिंदे सरकारमधिल मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना पूर्वी देवगिरी हा बंगला होता. आता देवगिरी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठेवून घेतल्याने मुनगंटीवार यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शेजारील मुक्तगिरी हा बंगला मिळाला आहे.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रालयासमोरील बी १ सिंहगड, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांना चित्रकूट,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन,पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन ,अन्न व औषधी प्रशासन संजय राठोड यांना शिवनेरी ,कामगारमंत्री सुरेश खाडे यांना ज्ञानेश्वरी ,रोजगार हमी योजना व फलोत्पादन संदीपान भुमरे यांना बी २ रत्नसिंधू , सार्वजनिक बांधकाममंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांना अ ६, रायगड ,कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना बी ७, पन्हाळगड, सहकारमंत्री अतुल सावे यांना अ ३ शिवगड ,राज्य उत्पादनमंत्री शंभूराज देसाई यांना बी ४, पावनगड तर पर्यंटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांना बी ५, विजयदुर्ग हा बंगला मिळाला आहे.

Previous articleरडायचं नाही, लढायचं…आत्महत्या करू नका ! मुख्यमंत्र्यांची बळीराजाला भावनिक साद
Next articleविधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांचा राडा;महेश शिंदे आणि अमोल मिटकरी भिडले