विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांचा राडा;महेश शिंदे आणि अमोल मिटकरी भिडले

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील सत्ता संघर्ष विकोपाला गेला असतानाच गेल्या चार दिवसांपासून विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पाय-यावंर सत्ताधा-यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करीत आहेत.मात्र आज शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार खडाजंगी झाली.दोन्ही बाजूनी सुरू झालेल्या घोषणाबाजीत वातावरण तापल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांत धक्काबुक्की झाली.शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.आमदार मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली.

 

पावसाळी अघिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पाय-यांवर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने करीत आहेत.५० खोके..एकदम ओक्के…गद्दार आला अशा घोषणाबाजीमुळे हैराण झालेल्या शिंदे आणि भाजपच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पाय-यांवर निदर्शने करून शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करून लक्ष्य केले.त्यांच्या या घोषणा सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांनीही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने अभूतपूर्व प्रसंग उद्भवला आणि सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले.यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एकमेकाविरोधात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटावर विरोधी पक्षांनी,पन्नास खोके,एकदम ओके”,”गद्दार”असे आरोप करीत घोषणा दिल्यामुळे त्या आमदारांत खदखद होती.त्यामुळे “आरे ला कारे” हे धोरण अवलंबल्यामुळे ही धक्काबुक्की झाली.विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी केली.मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावल्याचे देखील म्हटले आहे.

तर आम्ही सोडणार नाही !

हा गोंधळ सुरू असताना उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते.आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केले आहे.आम्ही कुणाला पाय लावत नाही.आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, असे ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आड जात नाहीत, आमच्या आड कुणी येऊ नये, असेही गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आले तर आम्ही सोडणार नाही. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असेही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाही, असे ते म्हणाले.आमदार दिलीप लांडे म्हणाले की, आम्ही लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने करत होतो. खरी परिस्थिती आम्ही लोकांसमोर ठेवत होतो. त्यांचे कपडे उतरले जात होते, ते त्यांना नको होते, त्यामुळे त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असे लांडे म्हणाले. यात कुणीही कुणाला धमकावलेले नाही. विरोधकांप्रमाणे आम्हालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जो कुणी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेतले जाईलच, असे ते म्हणाले.

५० खोके, एकदम ओक्के ही घोषणा जिव्हारी लागलीय

यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ५० खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळेच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्याने हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला बट्टा

आज झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आम्हीच धक्काबुक्की केली आणि पुढे देखील करू, अशी भाषा करतात, हे लोकशाहीला शोभणारे नाही. महाराष्ट्राने आजवर अनेक आंदोलने पाहिली, टोकाचा संघर्ष पाहिला.पण तो संघर्ष आजवर हणामारीवर आला नाही, आज जे झाले त्याचा निषेधच करायला हवा.

शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्या

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत असल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.

Previous article‘तो’ नकोसा बंगला शिंदे गटातील मंत्र्यांच्या पदरी,कोणत्या मंत्र्यांना कोणत्या बंगल्याचे झाले वाटप ?
Next articleसात हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू,आणखी सात हजार पोलिसांची भरती करणार