५० खोके घेऊन आमदार फोडले हेच राज्यातील जनतेला सांगायचंय !

मुंबई नगरी टीम

मुंबई । सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्याची मोहीम माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आजपासून सुरू केली.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ‘चला या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया या टॅगलाईनखाली जितेंद्र आव्हाड यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेची सुरुवात केली.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सोप्या भाषेत निकालाचे विश्लेषण करून सांगितले. शिवाय व्हीप कुणाचा लागू होतो आणि हे सरकार कसे असंविधानिक आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सांगितले. मनातील शंकाही यावेळी विचारण्यात आल्या त्याला सोप्या भाषेत जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. आपल्याला ही लढाई लढावी लागेल ती लढायला आपण सज्ज झाले पाहिजे असे आवाहन करतानाच ५० खोके घेऊन आमदार फोडले हेच महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे. तेच ५० खोके वापरून सरकारमध्ये बसले आहेत. तेव्हा हे खोके सरकार बसले आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ५० हजार पुस्तिका काढून लोकांपर्यंत पोचवणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.दरम्यान यावेळी संसदेत उपस्थित असलेल्या नेत्यांचा एक फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. या फोटोत उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे बिनचूकपणे शरद पवार यांनी सांगितली. त्याचवेळी हल्लीचा फोटोही दाखवा असा आग्रह केला. त्यावेळी स्क्रीनवर फोटो दाखवण्यात आल्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.

Previous articleकेंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी
Next articleधनंजय मुंडे लोकसभेची निवडणूक लढविणार की नाही ? मुंडेंनी स्पष्टच सांगितलं