शरद पवार आमचे विठ्ठल…मीही कच्च्या गुरूचा चेला नाही ! धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

मुंबई नगरी टीम

मुंबई । शरद पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत,याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला,तसाच कार्यक्रम आम्हीही केला,शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी करीत तीन बडवे बाजूला करायची गरज आहे, असा निशाणा त्यांनी नाव न घेता जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांना लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.मी माझ्या कौटुंबिक वारशाचे राजकारण बाजूला ठेऊन शरद पवार यांच्या सान्निध्यात अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो.घरात फूट पडणे,पक्षात फूट पडणे,त्यातून होणाऱ्या मानसिक वेदना यातून मी स्वतः याआधी गेलो आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली, याचाही विचार केला गेला पाहिजे.मला आयुष्यात मोठी संधी अजित पवार यांनी दिली, त्यांच्याचकडे पाहून मी पक्षात आलो,दादांना वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अनेक वेळा अन्याय सहन करावा लागला.शरद पवार यांनी टाकलेल्या तथाकथित ‘गुगली’ यशस्वी करण्यासाठी अनेकवेळा दादांना पुढे केले गेले,त्यातून त्यांना नाहक बदनामी सहन करावी लागली,हेही आता सहन शिलतेच्या पलीकडे गेले आहे,असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.यावेळी दुपारचे भाजपसोबत स्थापन झालेले सरकार,ही देखील एक गुगली नाही ना ? असा मिश्किल सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

शरद पवार हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु छगन भुजबळ यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशिष्ट बडव्यांनी घेरले आहे, त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास दिवसरात्र काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला होतो आहे, हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं, असंही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान ‘ते’ तीन बडवे कोण, याबाबत नाव घेणे मात्र मुंडेंनी टाळले.आम्ही भाजपसोबत सत्तेत सामील झालो असलो तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत.आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातल्या जनतेला निवडणुकांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी, जनतेची कामे करण्यासाठी आम्ही या सत्तेत सहभागी झालोत, असेही मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

Previous articleकुणाकडे किती आमदार उद्या होणार फैसला ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आमदारांना फोनाफोनी
Next articleसाहेब…तुम्ही आवाज द्या,बडव्याना बाजूला करा,सत्तेत राहून जनेतेचे प्रश्न सोडवू