प्रफुल्ल पटेल,सुनिल तटकरेंची हकालपट्टी ! नियुक्त्या,हकालपट्टी आणि अपात्रेची मागणी..दिवसभरातील सर्व घडामोडी एका क्लिकवर

मुंबई नगरी टीम

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिंदे -फडणवीस यांच्या सरकार मध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

राज्यात काल रविवारी राजकीय भूकंप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आपल्या समर्थक आमदारांसह युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत थेट राजभवनावर जावून अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे ,संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भातील राष्ट्रवादी पक्षाने केलेला ठराव विधानसभा अध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एक दिवसांपूर्वीच पत्र देवून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्याची केली आहे.त्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

सरकार मध्ये सहभागी झालेल्या अजित पवार,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे ,संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली असतानाच जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने नियुक्त केलेला विधीमंडळ पक्षनेता असल्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई । राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला.या सर्व घडामोडींना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार खासदार सुनिल तटकरे यांचा उघड पाठिंबा होता.प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची ही कृती पक्षविरोधी कारवाया असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे.

प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती
प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली असतानाच अजित पवार यांच्या गटाने थेट जयंत पाटील यांना हटवून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कालच्या शपथविधी नंतर राष्ट्रवादी अंतर्गत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत.प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.तर आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जंयत पाटील यांना हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर तर युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली असली तरी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद या पदांवर एकच व्यक्ती असू शकत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करून विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे असे स्पष्ट केले.तसेच ९ आमदारांना अपात्रतेची नोटीस देणे हे बेकायदेशीर आहे असेही अजित पवार म्हणाले.

अजितदादांसह ९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद

मुंबई । अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

येत्या ५ जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच शरद पवार यांच्या सोबत असणारा त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे पाटील यांनी स्पष्ट केले.आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत.विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Previous articleयेत्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचा पराभव करणार ! केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाकित
Next articleकुणाकडे किती आमदार उद्या होणार फैसला ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आमदारांना फोनाफोनी