येत्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचा पराभव करणार ! केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाकित

मुंबई नगरी टीम

अहमदनगर । गेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता.पंकजा मुंडे यांना हा पराभव जिव्हारी लागला होता.तेव्हा पासून त्या नाराज असून,त्यांना आपल्या पक्षात यावे असे आवाहन अनेक पक्ष करीत आहेत.मात्र तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने पंकजा मुंडे यांनी पक्षात यावे त्यांना मुख्यमंत्री करू अशी खुली ऑफर दिल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या असतानाच येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे मोठ्या फरकाने विजयी होतील आणि त्या मंत्री होतील, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता.त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर धनंजय मुंडे यांना कॅबिनेटमंत्री करण्यात आले.या पराभवामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या.त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.त्यांनी आपल्या पक्षात यावे म्हणून अनेकांनी प्रयत्नही केले मात्र पंकजा मुंडे यांनी भाजपात राहणे पसंत केले.तेलंगणचे मुख्यमंत्री तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण देत थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या असतानाच पंकजा मुंडे या पक्षात नाराज नसून,के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले असले तरी त्या त्यांच्या पक्षात जाणार नाहीत, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.एवढेच नाही तर पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी येत्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांचा पराभव करतील आणि त्यांना मंत्री केले जाईल, असे भाकित आठवले यांनी अहमदनगर येथे वर्तवले.

पंकजा मुंडे या आमदार नसल्याने त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही, असे स्पष्ट करीत,पुढे त्यांना मंत्री केले जाणार असल्याचे आठवले म्हणाले.तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात आले आहेत.त्यांचा पक्ष नविन असल्याने कुणीही पक्षात प्रवेश करतात मात्र पंकजा मुंडे यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी त्या त्यांच्या पक्षात जाणार नाहीत असेही आठवले यावेळी म्हणाले.के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही.ते महाराष्ट्रात कितीही कटआऊट लावू शकतात, आम्हीही तेलंगण मध्ये कटआऊट लावू,अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा इच्छुक आहेत.तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असताना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या दोन्ही इच्छुकांना एकत्रित आणल्याने वेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीस त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील,त्यामुळे तेव्हाची त्यांना माहिती नसेल !
Next articleप्रफुल्ल पटेल,सुनिल तटकरेंची हकालपट्टी ! नियुक्त्या,हकालपट्टी आणि अपात्रेची मागणी..दिवसभरातील सर्व घडामोडी एका क्लिकवर