देवेंद्र फडणवीस त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील,त्यामुळे तेव्हाची त्यांना माहिती नसेल !

मुंबई नगरी टीम

मुंबई । शरद पवार हे १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी ४० आमदार फोडून सरकार पाडले आणि जनसंघासोबत सरकार स्थापन केले.शरद पवार यांनी केले ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केले तर बेईमानी,असे कसे चालेल ? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.त्याला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत कदाचित त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्राथमिक शाळेत असतील त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसावी, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.शरद पवार हे १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात असताना ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्ष चालले.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्ष चालले असते. शरद पवार यांनी केले तर मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केले तर बेईमानी, असं कसं चालेल ? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले.आम्ही १९७७ साली सरकार बनवले. त्यामध्ये भाजप पक्ष माझ्याबरोबर होता.मी जे सरकार बनवले ते सर्वांना घेऊन, त्याच्यामध्ये त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर अडवाणी होते.आणखी काही सदस्य होते. पण माझ्या मते देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत असतील त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया देताना पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला.पवार जे म्हणाले ते खरे आहे. मी १९७७ मध्ये प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो ते शरद पवार यांनी निट ऐकले नाही किंवा ऐकले तरी त्यांना ते अस्वस्थ करणारे होते म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला.मी कुठेही शरद पवार यांनी बेईमानी केली, असे म्हणालो नाही.मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो,पण इतिहास बदलत नाही.कुणी जन्माला आले किंवा आले नाही यावर इतिहास ठरत नाही. इतिहासात लिहून ठेवले आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले आणि जनसंघासोबत त्यांनी सरकार तयार केले असे फडणवीस म्हणाले.ओबीसी नेत्याला अध्यक्ष करा हे त्यांच्या पक्षातील नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणाचा बोलबाला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलातात ते मी जाहीरपणे बोललो असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Previous articleजे स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत ते आज देश जिंकण्याच्या गोष्टी करत आहेत
Next articleयेत्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचा पराभव करणार ! केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाकित