ललित पाटील प्रकरण : दादा भुसे म्हणाले ‘पदासह राजकारण सोडेन’ तर अनेकांची तोंडं बंद होतील, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । ससून रूग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून ताब्यात घेतले आहे.ललित पाटील याच्या अटकेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या पाठीमागील सूत्रधार शोधून काढण्याची मागणी लावून धरली आहे तर शिवसेनेच्या ( उबाठा ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.ललित पाटील प्रकरणी अनेकांचे लागेबांधे समोर आले आहेत.याप्रकरणी सर्व चौकशी केली जाणार असून कोणालाही सोडले जाणार नाही त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येतील आणि अनेकांची तोंड बंद होतील अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.

ड्रग्ज माफीया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण ? त्याचा शोध लागला पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.ललीत पाटील याच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशिर्वाद आहे, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली,असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत, असे प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.तर शिवसेनेच्या ( उबाठा ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची पुन्हा एकदा मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातून अनेकांचे लागेबांधे समोर आले असल्याने अनेकांची तोंडं बंद होतील असा इशारा दिला आहे.’ड्रग्स मुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेवर आधारीत झालेल्या परिषदेत याचा बिमोड करण्यास सांगण्यात आले होते,त्यानुसार सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.मुंबई पोलिसांना नाशिक संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकली.आता ललित पाटीलला अटक केल्याने मोठं जाळं बाहेर येईल. या प्रकरणात असणारे लागेबांदे आता समोर आले आहे असल्याने अनेकांची तोंड बंद होणार आहेत.याप्रकरणाची सर्व चौकशी केली जाणार असून कोणालाही सोडले जाणार नाही असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कोणतीही चौकशी करा- मंत्री दादा भुसे

मी कोणत्याही आरोपांना भीक घालत नाही.ड्रग्ज किंवा इतर कोणत्याही प्रकरणात संबंध आला तर पदासह राजकारण सोडेन,असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा,आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करा असेही भुसे यांनी म्हटले आहे.सुषमा आंधारे यांनी पुन्हा चौकशीची मागणी असेल,त्याला सामोरे जायची तयारी असल्याचे देखील भुसे यांनी स्पष्ट केले.

ललित पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण ? – नाना पटोले.

महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण ? त्याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे.ड्रग्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललीत पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे ? हे उघड झाले पाहिजे असेही पटोले म्हणाले.

ललित पाटीलला महायुतीतील कोणाचा आशिर्वाद- विजय वडेट्टीवार

पुण्याच्या ससूनमधील ड्रग रॅकेटचा मुख्य आरोपी ललीत पाटील याच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशिर्वाद आहे, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत, असे प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.ललित पाटीलला कोणाची फूस होती, त्याला कोणी पळवले याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे रूग्णालयात ड्रगचा धंदा केला जातो. दुसरीकडे रूग्णांना औषध मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे.सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा होतो.हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून पुण्याच्या ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य जनतेसमोर आले पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले

Previous articleआरटीओतील बदल्यांमधील वशील्याला चाप ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय आता बदल्या ऑनलाईन पद्धतीने
Next articleमंत्री धनंजय मुंडेंनी करून दाखवलं ! स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या मित्राला दिली पुन्हा संधी