नारायण राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : अशोक चव्हाण

मुंबई नगरी टीम

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या कॉंग्रेसमधील स्वगृही परतण्याच्या बातम्या वेगात पसरत असतानाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.राणे यांना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही,असे चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून राणे कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चेने जोर पकडला होता.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच राणे कॉंग्रेसमध्ये ल़वकरच परततील,असे संकेत दिले होते.पण चव्हाण यांनी असा काही प्रस्तावच नाही,असे सांगत या चर्चांमधील हवा काढून टाकली.राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.तसेच थोरात यांनीही माझ्याकडे खुलासा पाठवला असून आपण असे काही बोललो नाही,असे म्हटले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राणे यांच्यासाठी कॉंग्रेस पायघड्या घालून तयार आहे,असा समज ज्या बातम्या येत होत्या त्यावरून झाला होता.परंतु राणे यांनी कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी आणि अशोेक चव्हाण यांच्यावर जहरी टीका केली. कॉंग्रेस ती टीका विसरणे शक्यच नाही.त्यामुळे कॉंग्रेसची दारे राणे यांच्यासाठी बंद झाली आहेत,असेच सध्याचे चित्र आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी नांदेड मध्ये चर्चा झाली होती परंतु काँग्रेस बाबत प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले असेल तर दुर्दैवी आहे असल्याचे सांगतानाच आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे आता त्यांनी ही चर्चेची तयारी दाखवावी असेही चव्हाण म्हणाले.राज्याला कर्जाच्या खाईत घालण्याचे काम या सरकारने केले आहे.केवळ कोट्यावधी रुपयांच्या घोषणा हे चुनावी जुमले आहेत असा टोला लगावतानात राज्यात लोकसभा विधान निवडणूका एकत्र घेतल्या तरीही आम्ही निवडणुकीसाठी तयार असून, या निवडणूकीत भाजपचा पराभव निश्चित आहे असेही चव्हाण म्हणाले.

Previous articleमहाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित ?
Next articleराहुल गांधी नांदेडमधून लोकसभा लढवणार?