मुंबई नगरी टीम
औरंगाबाद: शिवसंग्राम पक्ष येत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून दोन जागा लढवणार आहे,असे पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांनी आज सांगितले.मात्र आम्ही भाजपबरोबरच राहणार आहोत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेटे यांनी सांगितले की,दोन जागा आम्ही लढवणार आहोत.मात्र अंतिम निर्णय भाजपनेच घ्यायचा आहे.आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही.शिवस्मारकाची उंची घटवण्यात आलेली नाही,असेही मेटे यांनी सांगितले.उलट ती वाढवण्यात आली आहे.सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा शिवस्मारकाची उंची जास्त असेल.खरे तर दोन महापुरूषांची तुलना करणे योग्य नाही.पण शिवरायांच्या बाबतीत तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. शिवरायांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असेल,असा दावा मेटे यांनी केला.बुलडाणा जिल्ह्याचे नामकरण राजमाता जिजाऊ नगर असे करण्याची मागणीही मेटे यांनी पुन्हा केली.मेटे यांनी दोन जागा मागितल्याने भाजपपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेनेबरोबर युती झाली तर भाजपच्या जागांवर आपोआप मर्यादा येणार आहेत.भाजपला आपल्या कोट्यातील जागा सोडाव्या लागणार आहेत.