मुंबई नगरी
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे युती झाली नाही तर जालन्यात लोकसभेला दीड लाख मतांच्या फरकाने हरतील,असे भाकीत भाजपचेच सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवले आहे.त्यावर आज पत्रकार परिषदेत विचारले असता रावसाहेब दानवे यांनी काकडेंच्या बोलण्यापेक्षा पक्ष संघटनेवर जास्त विश्वास आहे,अशी सौम्य प्रतिक्रिया दिली.
प्रियांका गांधी राजकारणात आल्याने भाजपवर परिणाम होणार नाही.राहुल गांधी फेल झाल्यानेच प्रियांका यांना कॉंग्रेसने राजकारणात आणले,असे दानवे म्हणाले.सध्या राजकीय परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे.कितीही पक्ष आणि आघाड्या एकत्र आल्या तरी भाजपवर परिणाम होणार नाही.पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.
शिवसेनेशी युती करण्याची आशा भाजपने जवळपास सोडून दिल्याचे स्पष्ट होत आहे.लोकसभेच्या ४८ जागांवर लढण्याची भाजपची तयारी करण्यात येत आहे,असेही दानवे म्हणाले. सांगितले.गेल्या दीड महिन्यात मी राज्याचा दौरा केला असून ४६ मतदारसंघांचा आढावा घेतला आहे.रायगड आणि रत्नागिरीचा दौरा ३० जानेवारीनंतर करणार आहे.समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन टळू नये अशीच आमची इच्छा आहे.मतविभाजनाचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला होऊ नये,असे आम्हाला वाटते.पण ४८ जागा स्वबळावर लढण्याची तयारीही केली आहे.युती झालीच तर आमच्या तयारीचा शिवसेनेला फायदा होईल,असे दानवे यांनी सांगितले.
जागावाटपासाठी शिवसेनेकडून एकही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.त्यांनी तो मांडला नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.युती झाली नाही तरी गेल्या वेळेस जिंकल्या त्यापेक्षा एक जागा जास्तीची आम्ही जिंकू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या सोमवारी जालन्यात भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून तिला मुख्यमंत्री फडणवीस,भाजपचे राज्यातील सर्व मंत्री,१२०० पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.नंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.