शिवसेनेची मुख्यमंत्र्याची अट भाजपला अमान्य

मुंबई नगरी टीम

मुंबई: भाजप शिवसेनेच्या युतीसाठी नाकदुऱ्या काढत असला तरीही या निमित्ताने शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा,ही अट भाजपला मान्य नाही.यावरूनच युतीची चर्चा सुरू होत नसल्याची माहिती मिळत आहे.

युती झाली नाही तर सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे आहे,याची कल्पना शिवसेनेलाही आहे.अनेक पाहण्यांतून असे समोर आले आहे की,युती झाली नाही तर लोकसभेला शिवसेनेच्या चार जागाही येणार नाहीत. तरीही लोकसभेत शिवसेनेला रस नाही.विधानसभेत शिवसेनेला भरपूर पदरात पाडून घ्यायचे असल्याने शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची अट घातली आहे.भाजपने मात्र ही अट फेटाळून लावली आहे.शिवसेनेचा एक आमदार जरी जास्तीचा निवडून आला तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल हे मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच सांगितले आहे.

शिवसेनेने मोदी लाटेत ६३ जागा जिंकल्या.आता त्यांना निम्म्या म्हणजे १४४ जागांवर निवडणूक लढवायची आहे.शिवसेनेला १४४ जागा देऊन मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा,ही अटही आहे.भाजपची ही अट मान्य करण्याची तयारी नसल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.मात्र आता युतीबाबतचा निर्णय दिल्लीतील उच्चस्तरीय नेतेच घेतील,असेही सांगण्यात येत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले.शिवसेनेची ही ताकद नव्हती.पण विधानसभेला स्वतंत्र लढून शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले.आता १४४ जागांवर हक्क सांगून शिवसेना भाजपला कोंडीत पकडू पाहत आहे, याची कल्पना भाजपला आली आहे.मात्र सध्या भाजपसमोर लोकसभेचे आव्हान असल्याने भाजपला शिवसेनेसमोर झुकते घेण्याशिवाय पर्याय नाही.युतीची बोलणी मात्र यादरम्यान अधांतरीच लटकली आहेत.

Previous article१ फेब्रुवारीपासून केबल बंद ? : शिवसेनेचा इशारा
Next articleसंजय काकडेंच्या बोलण्यापेक्षा पक्ष संघटनेवर विश्वास :  दानवे