मुंबई नगरी टीम
पुणे: राज्य सरकारने २०१५मध्ये महाराष्ट्रात १९ लाख परवडणारी घरे बांधली जातील,असे वचन दिले होते.पण सरकारचे हे वचनही फोलच ठरले असून आतापर्यंत फक्त सव्वा दोन लाख परवडणारी घरे बांधून झाली आहेत. सरकारचे इतर आश्वासनांप्रमाणे हेही आश्वासन फोलच ठरले आहे,अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करून सरकारचा समाचार घेतला असून भाजपला उद्देश्यून जुमले पे चर्चा अशी उपहासात्मक टिप्पणीही केली आहे. एका इंग्रजी दैनिकातील बातमीचा आधार घेऊन आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की,सरकारचे आणखी एक फसलेले आश्वासन आहे. सरकारने १९ लाख परवडणारी घरे महाराष्ट्रात बांधण्याचे आश्वासन २०१५ मध्ये योजना सुरू करताना दिले होते.आतापर्यंत फक्त २ लाख २६ हजार ८३७ परवडणारी घरे बांधून झाली आहेत.हाही एक प्रकारे भाजप सरकारचा जुमलाच आहे,असा टोला सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे.
परवडणाऱ्या घरांबाबत सरकारने जी आश्वासने दिली होती त्यापैकी या ही आश्वासनाबाबत सरकारने जनतेची फसवणूक केली असून हे सरकार फक्त जुमलेबाजी करत आहे,अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे.पंतप्रधान आवास योजनेतून ही परवडणारी घरे बांधण्यात येणार होती.पण सरकार पाच वर्षांतील उद्दिष्टाच्या जवळपासही पोहचू शकले नाही, हे दाखवणारे वृत्त आकडेवारीसह मुंबई मिररने छापले आहे. त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी हे आणखी एक सरकारचे फसलेले आश्वासन,असे ट्विट केले आहे.