ममता बॅनर्जींचे वर्तन घटनेनुसारच : प्रकाश आंबेडकर

मुंबई नगरी टीम

लातूर:पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात जोरदार संघर्ष उफाळला आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारला सहकार्य न करण्याचे ममता बॅनर्जींचे वर्तन घटनेप्रमाणेच आहे,असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसवरही जोरदार टीका केली.

आंबेडकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयने राज्यात ढवळाढवळ करू नये,अशी नोटीस दिली होती.त्यामुळे कायदेशीररित्या ममता बॅनर्जी यांची कृती योग्यच आहे.कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतील मुद्दा आहे.या परिस्थितीत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने किंवा राज्यपालांच्या सहाय्याने कारवाई करू शकते.ममता बॅनर्जी यांच्या कृतीला माझा पूर्ण पाठिंबा आहे,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.त्यांना गरज पडली तर मी कोलकत्यालाही जाणार अाहे,असेही ते म्हणाले.

महाआघाडीत जाण्याबाबत ते म्हणाले की,जागावाटप हा मुद्दा नाही.ज्या जागांवर कॉंग्रेस पराभूत झाली आहे त्या जागा आम्ही मागत आहोत.कॉंग्रेसला जर भाजपला पराभूत करायचे असेल तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे.आज कॉंग्रेसमध्ये भाजपला हरवण्याची ताकद नाही,असा दावा आंबेडकर यांनी केला.

Previous articleसरकार खोटारडे,सरकारवर  विश्वास राहिला नाही: अण्णा हजारे
Next articleमुद्रांक शुल्क अभय योजनेस मान्यता