मुंबई नगरी टीम
बीड : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष चांगलाच तीव्र झाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील विकासकामांचे उद्घाटन करताना विधानपरिषदेतील विरोधी नेते धनंजय मुंडे यांना चांगलेच फटकारले.धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे म्हणाल्या की,बीडच्या विकासात जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून समुद्रात बुडवू.
एक महिला जेव्हा राजकारणात येते तेव्हा काहींना बाटलीत बंद करण्याची गरज असते तर काहींना बाटलीतून काढण्याची गरज असते.आता एक महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून मला ते चांगले समजते आहे.बीड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या ४०० कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.फडणवीस यांनी दोन टप्प्यांमध्ये ४९५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला.बीड जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी असल्याचे सांगताना त्यांनी जिल्ह्यात विकासकामे करण्याचे सोडून त्या राष्ट्रवादीने केवळ राजकारण केले.बीड जिल्ह्याने डझनभर आमदार दिले.पण जिल्ह्याला रूपयाचाही निधी दिला नाही,असा आरोप त्यांनी केला.पंचायत समितीची इमारत उभी करण्यासाठीही निधी मिळाला नाही.पण मुख्यमंत्र्यांनी चारशे पंच्चाण्णव कोटीचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर आरोप करताना सांगितले की,पूर्वी कागदावर रस्ते होत असत.बगलबच्च्यांना पोसण्याचे काम केले जात होते.आमच्या काळात सगळे ऑनलाईन व्यवहार असल्याने पोसण्याचे काम आम्ही करत नाही.बीड जिल्हा पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्या काळात प्रगती कसा करत आहे,हेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.