मुंबई नगरी टीम
मुंबई : “सहकारी गृहनिर्माण संस्थांना इनकम टॅक्स परतावा मिळावा, सोसायट्याना करमुक्त करावे, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पाठपुरावा करू. तसेच हा विषय संसदेत सुद्धा मांडला जाईल,” अशी ग्वाही खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुलुंड येथे दिली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मुंबई हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हौसिंग सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमास मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार तारासिंग, माजी आमदार चरणसिंग सप्रा, फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, जेष्ठ संचालक सिध्दार्थ कांबळे, बी डी पारले, जिजाबा पवार, जयश्री पांचाळ, कविता देशमुख, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक प्रभाकर शिंदे, निल सोमय्या, रवींद्र पवार, चंद्रशेखर प्रभू , स्थानिक नगरसेविका रजनी केणी, अनिशाताई माजगावकर उपस्थित होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहकारी चळवळीच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना इनकम टॅक्स मुक्त करण्यासाठी केंद्रित अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खासदार सोमय्या यांनी सांगितले. तसेच गृहनिर्माण संस्थांना सुविधा देण्यासाठी फेडरेशनचे उपकेंद्र पूर्व उपनगरात येथे उभारण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही खासदार सोमय्या यांनी केली.
दरम्यान, स्वयं पुनर्विकास योजनेसाठी शासनाने वन विंडो सिस्टीम सुरू करावी, अशी मागणी संस्थांनी केली.
त्यावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई बँकेने स्वयं पुनर्विकास अभियान सुरू केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठबळामुळे ही योजना आता एक गतिमान लोकचळवळ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी धोरण बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विंडोला तयारीही दाखवली आहे. याकामी मुंबई बँक व हौसिंग फेडरेशन पाठपुरावा करीत आहे. या योजनेत शेकडो सोसायट्या सहभागी होत आहेत. या योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी आम्ही कॉन्सॉरटियमच्या माध्यमातून उभारू. पण निधी कमी पडू दिला जाणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले. तसेच स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना आतापर्यंत ८५ टक्के कर्ज पुरवठा करण्याचे धोरण होते. पण यापुढे प्रकल्पाच्या ९६ टक्के पर्यंत कर्जपुरवठा केला जाईल, अशी घोषणाही आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.
हौसिंग फेडरेशनची पूर्व व पश्चिम उपनगरात तीन उपकेंद्रे लवकरात लवकर सुरू करू. त्यासाठी मुंबई बँक सहकार्य करील, असे प्रतिपादन सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांनी केले. तर मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी हौसिंग फेडरेशन कटिबद्ध असल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर प्रभू, उप निबंधक आर एस खंडाईत, म्हाडाचे कार्यकारी अभियंता दिलीप गरजे, ऍड डी एस वडेर, प्रणय गोयल यांनी विविध विषयांवर मार्गदशन केले. प्रास्ताविक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ डी एन महाजन यांनी केले.