देशाच्या प्रगतीसाठी महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक : अमृता फडणवीस

मुंबई नगरी टीम

मुंबई : ‘स्वच्छ स्वच्छतागृह’ ही महिलांची मूलभूत गरज आणि अधिकार आहे. आज स्त्रियां कामासाठी, शाळेसाठी घराबाहेर जात असतात. त्यांच्यासाठी स्वच्छ स्वच्छतागृह जागोजागी उपलब्ध असणे नितांत गरजेचे आहे. त्याच्या अभावामुळे स्त्रियांना अनेक आजार, किडनीचे आजार होतात. म्हणूनच देशाच्या प्रगतीसाठी महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. मुंबईत जेथे जागा उपलब्ध असेल तिथे महिलांसाठी स्वछतागृहे उभारण्यासाठी पुढाकार घेऊ’ असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांनी येथे नुकतेच केले.

आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नाने, दहिसर चेकनाका या मुंबईच्या प्रवेशद्वारावर फक्त महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वातानुकूलित स्वछतागृह आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्थानिक महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या. समस्त महिला वर्गाची मूलभूत गरज लक्षात घेऊन, प्रयत्नपूर्वक स्वछ आणि वतानुकुलीत स्वछतागृह येथे उभारल्याबद्दल प्रवीण दरेकर यांचे त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, जनहितार्थ स्वछतागृह उभारताना सर्वात मोठा अडथळा येतो तो परवानग्यांचा. परवानग्या मिळाल्या तर मुंबईच्या मुलुंड आणि वाशी प्रवेशद्वारावरही फक्त महिलांसाठी स्वच्छ व वातानुकूलित स्वछतागृह उभारू. निधीची कमतरता नाही पण परवानग्या मिळत नाहीत. त्यासाठी आपण मदत करावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात अमृता फडणवीस यांना केले होते. तसेच राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्याना मूलभूत सुविधा देण्याची गरज व्यक्त केली होती.

यासंदर्भात बोलताना अमृता फडणवीस यांनी,  ‘महिलांच्या मूलभूत गरजेसाठी परवानग्यांचा अडथळा येत असेल, तर हा अडथळा दूर करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत लढा देऊ. पण महिलांचा मूलभूत हक्क मिळवू देऊ,’ असे आश्वासन दिले. “फक्त स्वछतागृह असून चालणार नाही, तर ते स्वच्छ असायला हवे. तसे नसेल तर महिलांना गंभीर आजार होतात. किडनीचे आजार होतात. केवळ स्वछतागृह नसल्याने या आजारांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी शहरात जेथे जागा उपलब्ध असेल तिथे महिलांसाठी स्वच्छ स्वछतागृह उभारणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्याच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्र नंबर वनवर आहे. राज्यात हे अभियान 90 % राबविले गेले आहे. या अभियानात स्वछतागृह असणे निकडीचे आहे. तेव्हा महिलांसाठी स्वछतागृह उभारून उर्वरित 10 % अभियान यशस्वी करूया,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय उद्यानातील अदिवासी पाड्याच्या व वनजमिनीवरील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तेथील महिलांना स्वछतागृह, वीज, स्वछ पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी हा विषय आपण मुख्यमंत्र्यांकडे लावून धरू, असेही आश्वासन दिले. तसेच रिक्षा चालक,  शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या महिला संस्था, स्थानिक महिलांच्या विविध विषयांवरील निवेदने स्विकारली. त्यांच्या समस्या सोडण्याचेही आश्वासन दिले.

स्वछतागृह नसल्याने महिला प्रवासाला निघताना कमी पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लांबचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या या महिलांच्या समस्यांची जाण ठेऊन प्रवेशद्वारावर असे स्वच्छ स्वच्छतागृह आमदार दरेकर यांनी उभारले. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशीच स्वछतागृहे मुंबईत सर्वत्र उभारणे गरजेचे आहे, असे उदगार पत्रकार प्राची पाठक यांनी यावेळी काढले. मुंबईत महिलांना स्वच्छ स्वछतागृहाचा अभावावर प्राची पाठक यांनी वृत्तपत्रात लेख लिहून लक्ष वेधले होते. आमदार प्रवीण दरेकर यांनी त्याची दखल देऊन अंमलबजावणी केली. त्याबद्दल पाहुण्यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमात हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, आरपीआयचे रमेश गायकवाड, गीता नलावडे यांची भाषणे झाली. निशा परुळेकर यांनी प्रभावी सुत्रसंचलन केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाजप प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

Previous articleम्हाडाच्या संक्रमण श‍िब‍िरातील रह‍िवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार
Next articleअण्णांमुळे मोदी सत्तेत आले आणि त्यांनाच विसरले : राज ठाकरे