अण्णांमुळे मोदी सत्तेत आले आणि त्यांनाच विसरले : राज ठाकरे

 मुंबई नगरी टीम

अहमदनगर: गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.यावेळी त्यांनी अण्णांशी बंद दाराआड चर्चाही केली.मात्र त्यातील तपशील बाहेर आलेला नाही.

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी अण्णांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.सरकारने काल जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना चर्चेसाठी पाठवले.पण चर्चा निष्फळ ठरली. आज राज ठाकरेे यांनी राळेगणला जाऊन अण्णांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा जाहीर केला.राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कृतघ्नतेचा आरोप केला आहे.अण्णांच्या आंदोलनामुळेच भाजप सत्तेत आला.पण आता त्यांनाच विसरला.हे सगळे कृतघ्न आहेत,असे राज ठाकरे यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राज ठाकरे म्हणाले की,अण्णा, या नालायक माणसांसाठी जिवाची बाजी लावू नका. ही अत्यंक खोटारडी,ढोंगी माणसे आहेत. नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्च करू नका. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच मोदी आज सत्तेत बसले आहेत.राज ठाकरे यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

दरम्यान अण्णा मात्र आपल्या उपोषणावर ठाम असून निर्णय झाला नाही तर येत्या नऊ तारखेस पद्मविभूषण पुरस्कारही परत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून राजकीय नेत्यांना निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो याची जाणीव झाल्याने अनेकांची पावले राळेगणकडे वळत आहे.

Previous articleदेशाच्या प्रगतीसाठी महिलांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे आवश्यक : अमृता फडणवीस
Next articleभाजप शिवसेनेचे  जागा वाटप ठरले