मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या सुधारित प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई । कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.या प्रकल्पाच्या मूळ खर्चात २३ हजार १३६ कोटींनी वाढ झाल्याने आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा हा सुधारित खर्च असेल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.

सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत.या सुधारित वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख एवढे झाले असून या वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे.ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

रत्नागिरी शहर हे कोकणातील उच्चशिक्षणाचे देखील प्रमुख केंद्र आहे.जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असून लोकसंख्या १६.९६ लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच निर्माण करण्यात येणाऱ्या श्रेणीवर्धित जिल्हा रुग्णालयाचा लाभ होणार आहे.या निर्णयामुळे जिल्ह्याची वैद्यकीय व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.रत्नागिरी मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी मंत्री उदय सामंत यांनी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न केले होते.

नुकसानग्रस्तांना मदतीच्या दुप्पट रक्कम देणार
गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous articleचित्रा वाघ यांच्याकडून मंत्री संजय राठोडांचा एकेरी उल्लेख; त्याच्या विरुद्धचा लढा सुरू ठेवणार
Next articleराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ६ दिवस चालणार