मुंबई नगरी टीम
परळी : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार असून आघाडीचा चित्रपट अभिनेता अक्षयकुमार हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी तयारीला वेग आला आहे. दरम्यान, विवाहाची नोंदणी सुरूच असून ती १८ तारखेपर्यंत करता येणार आहे.
शहरातील तोतला मैदानावर २२ तारखेला सायंकाळी ६ वा. गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. दुष्काळात सापडलेल्या पालकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व खा प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देवून पंकजा मुंडे हया कन्यादान करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अक्षयकुमार हे सोहळ्यातील वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी परळीत येणार आहेत.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यावर्षी पाऊस नसल्याने सर्व सामान्य माणूस दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे, अशा स्थितीत मुला-मुलींचे लग्न कसे करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. विवाह सोहळ्याच्या नोंदणीला विवाहेच्छू वधू वरांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ७५ विवाहाची नोंदणी झाली आहे. नोंदणीची तारीख वाढविण्यात आली असून आता १८ फेब्रुवारी पर्यंत वधू वरांची नोंदणी करता येईल. दरम्यान, ज्या मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे त्या तोतला मैदानाची साफ सफाई व मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या असून तयारीला वेग आला आहे.